Saturday, March 4, 2017

पाऊस (परदेशातून घरच्या पावसासाठी आतुर झालेलं मन..!!)


मुंबईच्या पावसाची आठवण येते खूप
इथे 'आपल्यासारखा' पाउस पडतच नाही
अधून मधून नेहमीच येणाऱ्या पाहुण्यांसारखा वर्षभर येतच राहतो
मनापासून वाट पहावी त्याची अस वाटतच नाही

ऑफिसच्या ठरलेल्या वेळेसारखा मोजूनमापून पडणारा इथला पाउस
त्याला आपल्या बेधुंद कोसळणाऱ्या पावसाची सर नाही
हात पसरून स्वच्छंद भिजावं
एवढ मनमोकळ आकाशही नाही

मुंबईचा पाउस आठवावासा वाटतो खूप
मरगळ झटकावी तशी फडफडणारी झाडांची पान
सोसाट्याचा वारा आणि काळ्या ढगांची गर्दी
पाण्याने ओथंबून कोसळायला आतुर झालेले ते काळे ढग
घरातली झाडासमोरची ती खिडकी
आणि हातातला तो चहाचा कप
उडणारे ते केस आणि वाऱ्याबरोबर आलेले पावसाचे ते पहिले थेंब

"कधीची वाट पाहतोय तुझी", पुन्हा उशीर केलास म्हणणारे मन
आणि पावसाचे सगळे गुन्हे माफ म्हणत पुन्हा त्याला आपलस करणार मन
त्याने खूप बरसाव, वर्षभर मनात साचलेल धुवून काढव
मन प्रसन्न व्हाव पुन्हा, झाडाच्या धुतलेल्या पानांसारख

रात्री झोपताना बाहेर पडणारा तो पावसाचा आवाज
अंगावर ओढलेली ती गोधडी आणि मनात अजूनही भिजणारे आपण
आपला मुंबईचा पाऊस खरच काहीतरी वेगळाच आहे
त्याची आपली म्हणून वाट पाहन यातच खरी मजा आहे
-सागर