Thursday, August 7, 2014

असण आणि नसण....आपल्यात नसलेल्या .. असलेल्यांसाठी..!!


असण आणि नसण
फारसा फरक नसलेल्या शब्दांमध्ये 
अस्तित्वाच अस्तित्व सामावलंय 

श्वासाच्या उष्म्यापासून, बंद श्वासाच्या थंडाव्यापर्यंत
असलेल्या सर्वांमधून, नसलेल्या सर्वांमध्ये 
आयुष्यातले हसरे आणि रडवे अनुभव
अर्ध्यावरच सोडावे लागणारे आयुष्याचे पर्व

श्वासांनी केलेल्या झुंजीपासून, आठवणींच्या उजळणीपर्यंत 
आईच्या उदरातल्या पहिल्या श्वासापासून 
अडखळनाऱ्या शेवटच्या श्वासापर्यंत 
आयुष्याच्या एका पल्ल्यापासून .. सरणापर्यंत 

पुन्हा आयुष्य, कुणाच्या असण्यापासून नसण्यापर्यंत 
उरलेल्या आठवणींपासून, कुठेच नसलेल्या जाणिवेपर्यंत
उरलेल्या वस्तूंपासून, कुठेच नसलेल्या अस्तित्वापर्यंत 

डोळ्यातून पाझरणारे अश्रुंचे बांध 
अजून गरज आहे तुझी, आर्जव करणारे मन 
नको सोडून जाउस म्हणणाऱ्या हातांना
उडणाऱ्या, जळणाऱ्या राखेचा होणारा स्पर्श
हृदय पिळवटून टाकणाऱ्या हाकेपासून, ऐकूही न जाणाऱ्या कानांपर्यंत 
असणाऱ्या आपल्यांपासून ... नसणाऱ्या आपल्यांपर्यंत...!!

-- सागर 

No comments:

Post a Comment