Sunday, March 31, 2013

बघ माझी आठवण येते का..??

रात्रीचे आठ साडे-आठ वाजलेले
ऑफिसातून हळू हळू उतरणारी तू
तुझी पावले आज संथ सावकाश
सरळ पण तरीही इथे तिथे शोधणारी तुझी नजर
न राहवून पुन्हा खाली बघून चालताना
बघ माझी आठवण येते का..??

आज सरळ स्टेशन कडे गेली नाहीस तू
समोरचा तो मरीन ड्राइव चा समुद्र
तो खळखळणारा सागर आणि अशांत वारा
वाऱ्यासंगे उडणाऱ्या तुझ्या त्या मोकळ्या केसांच्या बटा
इतक्या अशांतेतही तू तिथे एकटी आज
प्रत्येक येणाऱ्या त्या सागराच्या लाटेबरोबर
बघ माझी आठवण येते का..??

डोळ्यातल्या पाण्यासंगे सागराला निरोप देणारी तू
आणि मनात नसतानाही स्टेशनकडे वळणारी ती पावलं
आज ट्रेन पकडायची ती घाई नाही
एकटच जायचं आज पुन्हा
आज सोबत काय....पण मागच्या पुढच्या डब्यातही मी नाही
खिडकीतून एकटक बाहेर बघताना
बघ माझी आठवण येते का..??

एक एक स्टेशन जाताना
आठवणीही सरकत होत्या त्या मागच्या सहा वर्षाच्या
एकमेकांच्या हातात हात देऊन सुरु झालेला तो प्रवास
आणि अचानक त्या आठवणीने हसून रडणारी तू
कित्ती कित्ती क्षण ते आपले
तो प्रत्येक क्षण आठवताना
बघ माझी आठवण येते का..??

-- सागर 


No comments:

Post a Comment