Monday, September 24, 2012

आपल जगण.. !!

ट्रेनच तिकीट काढताना लक्षात आलं, बाजूच्या खिशात ठेवलेली १०० रुपयाची नोट रुमाल काढताना पडली कुठेतरी. असे पैसे गेले कि दरिद्री, संपल्याची भावना येते न ती खूप वाईट असते हो..!!! सामान्य माणूस हो आपण, सकाळी प्रवास करता करताच संध्याकाळी मुलांना काय खायला घेऊन जायचं याचा विचार करून ५० रुपये बाजूला काढणारे आपण. मग असे आपल्या भाषेत काही खाता न पिता पैसे गेले कि हळहळण खूपच जीवाला लागत हो..!!

तसाच उभा राहिलो प्ल्यटफोर्मवर ... रोज उशीर होतो म्हणून आज घरातून लवकरच निघालो होतो , पण घाईघाईत १०० रुपये पाडून बसलो कुठेतरी, आज दिवस भर चलबिचल होत राहणार मनात....!!!

कसना आपल सामान्य माणसाच आयुष्य, किती काळजीने अक्षरशा पोखरलेल असत...!! अस पैसे पडणं किंवा असे इतर प्रसंग घडण आणि हळहळण सामान्य माणसाठी खूपच असामान्य गोष्ट आहे. कुठे लक्ष असत आजकाल माझ तेच कळत नाही, सकाळी पेपर वाचतानाच जो मूड खराब होतो तो दुपारी डब्बा उघडल्यावर  एकतर त्याहून खराब होतो किवा थोड फार हसू येत चेहर्यावर....चिडचिड वाढलीये आजकाल खूप...पण मला आज मनातल बोलावस वाटतंय .... प्रेमाने काकुळतीला येऊन चीड मांडावीशी वाटतीये..!!

जरा समजून घ्या जमल तर......!!

वर्तमानपत्रातले ते पहिले दुसरे आणि तिसरे पान
घोटाळा, भ्रष्टाचार, बलात्कार यांनाच मान
माझा ८००० चा पगार हि पुरतो हो आम्हाला
साहेब तुम्ही ८०००० कोटी कसे खर्च करता हे तरी कळू द्या राव आम्हाला

राग न वाटता , अभिमानच वाटतो तुमचा
कस बर जमत, सांगा कधी गरिबांना
१०-१२ तास काम, प्रवास करून थकत हो मन
तरी महिन्याच्या शेवटच्या तारखेकडे लक्ष ठेवून स्वतःच उल्हसित होत हो मन...!!

साहेब घोटाळ्यातल्या पैशात माझ्या घामाचाही पैसा आहे म्हणतात
मला नाही कळत हो साहेब..... लोकच म्हणतात
मुलगा सायकल मागतोय, पण या महिन्यात बायकोच आजारी पडली हो
सायकल राहिली, होत्या त्या पैशातून औषधही पूर्ण आली नाहीत हो
चाक माझ्या डोक्यात मात्र फिरत राहिली ... महिन्याचे उरलेले दिवस पाहून हो...!!

रोजचे कित्ती प्रश्न मांडलेले..
वाढलेल्या बस प्रवासापासून, सगळेच भाव वाढलेले
१०-१० रुपये खर्च होताना, महिन्याचे उरलेले दिवस आठवतात हो साहेब..
साहेब सांगा ना.. तुम्ही भ्रष्टाचार केले नसता तर थोड तरी स्वस्त जगता आल असत का हो साहेब...!!

५ वर्षातला १ दिवस मी राजा असतो
साहेब हात जोडून विनवणी करतात हो... भावूक मन होऊन मीही दुसर्या दिवशी मतदान करतो हो...

पण...

हात जोडणारे साहेब मोठे झालेत आता...
आज मी हात जोडून पाया पडल्या तरी साहेब ओळखताच नाहीत हो मला...
दुचाकी निशाणी असलेले साहेब, चार चाकातून थंड फिरतात हो आता...
साहेबांनी कुणाच्या प्रगतीसाठी हात जोडले तेच कळत नाही हो आता..
नगरसेवक / आमदार / खासदार साहेब सांगा ना ... मला ही थोडा पगार वाढवून हवाय हो, मुलाची सायकल राहिलीये अजून.. हात जाऊ दे, कुणाच्या पाया पडू, ते तरी सांगा हो साहेब आता...!!

नाक्यानाक्यावर पैसे खाल्याचा चर्चा होतात हो आता ...
साहेब....एवढ सगळ मोकळ मोकळ झालाय का हो आता..??
मी आपला परवा बसमध्ये २ रुपयाच कुणाचतरी पडलेलं नाण उचललच नाही हो ...!!
अब्रू कुणाची महाग, स्वस्त विचार करायला हवा हो आता..!!

साहेब १२ महिन्याचे आहात का हो तुम्ही..??
वाढदिवसाचे कित्ती कित्ती पोस्टर्स तुमचे??
काल बायकोचा वाढदिवस  विसरलो
साहेब...धन्यवाद तुमचे, निदान तुमच्या पोस्टर्सने आजतरी लक्षात आणले माझ्या

सामान्य माणसाचे दिवस कसे जाणार हो ..??
दडपण, भीती वाटते खूप
खूप जगावस वाटत पण
जीवघेणा प्रवास... जीव घेण्यासाठीच आसुसलाय
छातीवर ओझ जाणवत खूप
दडपते काळजीने छाती

हरवून जावस वाटत कधीतरी ....
सगळ सोडून स्वतासाठी डोळे बंद करून श्वास घ्यावासा वाटतो कधीतरी ...
सगळ नीट सुंदर होईल अस वाटत कधीतरी...!!

झाडाच पान व्हावस वाटत मला
सुंदर हिरवं गार
पाऊस झेलत ... कोवळी उन्ह घेत स्वछंद फडफडवास वाटत मला
चालेल छोट आयुष्य पण मोकळा श्वास घ्यावास वाटतंय मला ...!!

---------------------------------------------------------------------------
धक्का कोणी मारला???
ट्रेन आली वाटत ....पाठीच राहिलो आजही सर्वांच्या
आजही उभ्यानेच जाव लागणार वाटत मला....!!

----- सागर

1 comment: