Tuesday, July 24, 2012

मृत्यू ....एका आजोबांचा





८२ वर्षीय आजोबांचा मृत्यू .... रोजची तशी नेहमीचीच, दुर्लक्षीलेलीच एक सर्वसामान्य बातमी. घरातल्यांसाठी थोडी दु:खाची, इतरांसाठी थोड दु:ख आणि उपस्थित राहाण्याच निव्वळ कर्तव्य.....

पण या सर्वात काही व्यक्ती थोड्या जास्तच खिन्न असतात, सगळे गेलेल्या आजोबांच्याच वयाचे. खिन्न अगदी पापणी न मिटता शून्यात लावलेली नजर. वाटल, कि मित्र गेला असेल, आठवणीत गढले असतील, म्हणून जास्त लक्ष दिल नाही.

पण का कोण जाणे गेलेल्या आजोबांपेक्षा कदाचित शून्यात गेलेले आजोबाच जास्त डोळ्यासमोर येत होते. काय एवढा विचार करत असतील?

काय अंतर असेल एका मेलेल्या वृद्ध माणसात आणी भान हरपलेल्या अजूनही जिवंत धडधडणाऱ्या हृदयात?? तसे मृत्यू कुठल्याही वयात होतात, पण वृद्धाने वृद्धाचा मृत्यू पाहिल्यावर काय विचारतरंग उठत असतील, या गोष्टींचा नक्कीच विचार करावासा वाटतो ...

कदाचित थोड फार असाच वाटत असेल त्या .... आणि तश्याच इतर आजोबानाही!!


समोरचा तो निष्प्राण देह
ना हालचाल , ना गंध
थंड गार, न उष्मा श्वासाचा
मन शांत....कोमेजलेल
गेला तो ........

मी पण असाच जाणार??
कुठे गेला जीव माझा?
जीर्ण म्हातारा जख्खड होतो मी
तरी सगळे म्हणतात
वृद्धापकाळ म्हणजे दुसर बालपण

पण जगताच नाही आल मला
अंतरा अंतराने एक एक म्हातार बाळ जात राहील
ना रडल, ना हसलं
डोळे मिटले, ना पापण्या ओल्या
प्राण गेला, श्वास हि सोडला
सगळ पाहायचच राहून गेल
साल ..... पुन्हा जगायचंच राहून गेल

थकलो रे मी .... धावायचं होत मला
नाही नीट चालू शकलो....... लपायचं होत मला
असह्य वेदना आजाराच्या..... सर्व विसरून हसायचं होत मला
खुपश्या आठवणी...... मन मोकळ बोलायचं होत मला
पण एकटाच मी..... माझ मलाच होता नाही आल रे मला


माझाही श्वास असाच जाईल?
शांत निष्प्राण मेलेला मी .....मला अनुभवता येईल काही?
कस असेल ते सर्व?
कधी असेल ते सर्व?
मला जगायचं ..... अजून जगायचं!!
पोखरतय मला आतून
खूप धडधड वाढलीये
नका जाळू मला
माझा अस्तित्वच नष्ट करू नका
आज आहे... आणि उद्या राख????
तीही नाहीशी होईल... एका वाऱ्याबरोबर

उरेल फक्त .......माझा...............एक फोटो!!!


-------------------------------------------------------------------------------


---- सागर







2 comments: